रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज
पुणे (प्रतिनिधी)
राज्यात महसूल विभागात सर्वात मोठ्या हवेली तालुक्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती होण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या नातेवाईकांनी लॉबिंग सुरू केले आहे संबंधित तहसीलदार हा एका बड्या नेत्यांचा निकटचा नातेवाईक असून त्या माध्यमातून त्याने यंत्रणेवर दबाव आणला आहे.
हवेलीच्या विद्यमान तहसीलदारांचा हवेली तालुक्यातील कार्यकाळ संपण्याआधीच त्यांची उचलबांगडी करण्याचा चंग बांधला गेला आहे. संबंधित तहसीलदारांनी पक्षाचे चांगले काम केल्याने बक्षीस म्हणून मलाईदार हवेली तालुक्यात नियुक्ती व्हावी अशी गळ बीड व पुणे जिल्ह्यातील नेत्यांना घातली गेली आहे. राजकीय पक्षाच्या कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती म्हणजे तहसील कार्यालयास राजकीय पाठबळ नको अशी माफक अपेक्षा तालुक्यातील सामान्य जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.
राज्यात सर्वात मलईदार तालुका म्हणून हवेली तालुक्याची गणना होते या ठिकाणी वर्णी लागावी म्हणून महाराष्ट्रातूनच नव्हे तर दिल्ली दरबारातून वशिला लावला जातो सध्या सुनील कोळी यांनी 21 फेब्रुवारीपासून तालुक्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचा आणखी तब्बल 13 महिन्यांचा कार्यकाळ बाकी आहेत परंतु राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी डोहाळे लागले व सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले म्हणून हवेली तालुका बक्षीस म्हणून मिळावा अशी गळ घातली जात आहे.
यासाठी बीड जिल्ह्यातील वजनदार मंत्री महोदयांकडून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचेही समजते.
सध्या कार्यरत असलेले तहसीलदार सुनील कोळी यांना हटवून नवीन तहसीलदार यांची नियुक्ती व्हावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. संबंधित तहसीलदार पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
तसेच विद्यमान तहसीलदार यांना नियमबाह्य हटवून तालुक्यातील जनतेला एका राजकीय पक्षाच्या संबंधित अधिकाऱ्याची वर्णी लावणे आयते कुरण अधिकाऱ्यास देण्यासारखे आहे, त्यामुळे तालुक्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे तालुक्यातील तहसील कार्यालय सत्ताधारी पक्षाचा राजकीय अड्डा बनू नये अशी माफक अपेक्षा तालुक्यातील सामान्य जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.
#मर्जीतील_अधिकारी_जिल्ह्यात_आणण्याची_स्पर्धा
राज्यात भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांनी हे पद पटकाविले पवार यांचा अधिकाऱ्यांवर चांगलाच दाब असतो, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषद सीईओ बदलून येथे नवे कारभारी बसविले, त्यातच पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा आता नंबर असल्याची चर्चा आहे त्यातच हवेली तालुका तहसीलदार पदासाठी लॉबिंग सुरू झाल्याने पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.