पुणे – मागील दोन दिवसांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ई-बसमधील गणवेशातील कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीएमपी कर्मचाऱ्यांना व्हिडीओ आणि फोटो ‘व्हायरल’ करण्याबाबत प्रतिबंध घातले आहे.
मागील वर्षापूर्वीचा सजवलेल्या बसमधील एका ‘ऑन ड्युटी’ कर्मचाऱ्यांचा ‘टिक टॉक’ ऍपद्वारे तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुषंगाने प्रशासनाने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याबाबत नवीन आदेश सर्व आगारप्रमुख आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक प्रशासनाने शुक्रवारी जारी केले.
‘प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने, यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांनी आगारातील सर्व चालक, वाहक आणि खासगी बसेसवरील चालक सेवकांना व्हिडीओ किंवा फोटो तयार करून व्हायरल न करण्याबाबत सूचित करावे. यासह वाहक आणि चालकांनी प्रवासी नागरिकांना देखील याबाबतचे व्हिडीओ व्हायरल करण्यास प्रतिबंध करावा,’ याबाबत स्पष्ट सूचना देण्याचे आदेश परिपत्रकात दिले आहेत.
‘सूचना देऊनही वाहक आणि चालक सेवक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल केल्याचे निदर्शनास आल्यास त्या सेवकांचे अहवाल पुढील कारवाईसाठी खातेनिहाय चौकशी विभाग आणि वाहतूक व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवावे,’ असे या आदेशात नमूद केले आहे.