मुंबई : विद्यापीठ स्तरावर समुपदेशन केंद्राची निर्मिती करून विद्यार्थांना दर आठवड्यात मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या.
मुंबई विद्यापीठात राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि रजिस्टार यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.या चर्चासत्रामध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. ही प्रणाली राज्यातील पाच विद्यापीठांमध्ये सुरू आहे. उर्वरित विद्यापीठांमध्ये तांत्रिकबाबी दूर करून ही प्रणाली लवकर सुरू करावी, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.
सामंत म्हणाले, विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम तयार करत असताना स्थानिक विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करावा. शिक्षणानंतर विद्यार्थांना नोकरी उपलब्ध होऊ शकेल, याचा विचार विद्यापीठांनी करावा, असेही सामंत यांनी सांगितले.यावेळी व्यवसाय पदवी कार्यक्रम आणि विद्यार्थांच्या रोजगार वाढीकरिता विद्यापीठातील कौशल्य विकास उपक्रम याबबत आढावा घेण्यात आला.
शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासन आणि विद्यापीठे एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असे सामंत यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठ, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात कॅटलायझिंग इनक्युबेशन या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संवादाची गरज असते. यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे तसेच राज्यातील सनदी अधिकाऱ्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. त्यामुळे विद्यार्थांना फायदा होईल.विद्यापीठाचा परिसर हा तंबाकू, धूम्रपान, प्लास्टिक आणि कचरामुक्त असावा. आपली विद्यापीठे ही आदर्श विद्यापीठे असली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते पण त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा. असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.