जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून प्रवेशद्वाराला खंडोबा गडावरील मुख्य द्वाराचे रूप देण्यात आले आहे. या प्रवेशद्वारावर आधुनिक स्वरूपाची आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने हा परिसर उजळून निघाला आहे.
जेजुरी रेल्वे स्थानकात १४ कोटी ७० लाख रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. त्याअंतर्गत या स्थानकाच्या प्रवेशद्वाराची सुधारणा करण्यात आली आहे. जेजुरीचे खंडोबा हे कुलदैवत असल्याने प्रसिद्ध शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा गडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. अगदी हुबेहूब दगडी बांधकामासारखी प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली असून या प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे नुकतेच सुरू करण्यात आले आहेत.
या ठिकाणी केलेली रोषणाई रोज सुरू असणार आहे. पिवळ्याधमक सोनेरी रंगामुळे हे प्रवेशद्वार खुलून दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या सुधारणेसाठी व इतर कामांसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा केल्याने १४ कोटी ७० लाख रुपयांची विविध कामे सुरू झाली आहेत. जेजुरी रेल्वेस्थानक महाराष्ट्रातील आदर्श रेल्वेस्थानक असेल, असे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी सांगितले. दरवर्षी खंडोबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक रेल्वेने जेजुरीला येतात. या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे भाविकांना चांगल्या सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत.