पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
अल्पवयीन मुलं अन कॉलेज कुमार मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरताना पुणेकरांनी पाहिलेत, पण एक प्रोफेशनल डान्सर अन तो मौजमजेसाठी दुचाकी चोर असे प्रथमच पुण्यात घडले असावे. याच प्रोफेशन डान्सरला अन त्याच्या साथीदारांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 25 दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्याकडून आणखी काही दुचाकी जप्त होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
संजय हरिष भोसले उर्फ सोन्या (वय 20), ऋषीकेश बाबासाहेब डोंगरे उर्फ बिट्टु (वय 19), अभिषेक अनिल भंडगे उर्फ मोनु (वय 19), अजित कैलास कांबळे उर्फ विठ्ठल (वय 21, रा. सर्व रा. शेवाळवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरात घरफोड्या अन वाहन चोरी हे नित्याचेच झाल्या आहेत. सर्व काहीकरूनही पोलीसांना त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, हडपसर पोलिस पेट्रोलिंग करीत असताना मगरपट्टा चौकातील वाहने पार्कींगमध्ये चार जण संशयास्पररित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संजय, ऋषिकेश, अभिषेक, अजितला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीची कबूली दिली. त्यांच्याकडून हडपसर 11, वानवडी, कोंढवा, सिहंगड, सहकानगर, मार्केटयार्ड, येरवडा, शिवाजीनगर, लोणीकंद, लोणीकाळभोर, यवत, शिवाजीनगर, लातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक मिळून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
चोरलेल्या दुचाकी ते ग्रामीण भागात विकणार होते. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी संजय असून त्याने तिघांना एकत्रित केले. अभिषेक प्रोफेशनल डान्सर आहे. एका डान्स अॅकेडमीच्यावतीने तो परफॉम करतो. चौघेही मागील सहा महिन्यांपासून मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, शाहिद शेख, शशिकांत नाळे, गोविंद चिवळे, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.