रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
आम्ही शिवसेनेला फसविले असून कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू. मात्र, आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीला माफी नाही असे म्हणत तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर आपल्याकडचाच भाजपचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही याची काळजी घ्या असा टोलाही लगावला.
मुनगंटीवार यांनी शिवसेनेला फसविल्याची कबुली देत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह इतर पक्षांनी गैरफायदा घेऊ नका असे त्यांनी सुनावले. तुमचे तीन महिन्यापासूनचे संबंध असून आमचे 30 वर्षांचे संबंध होते. महाविकास आघाडी सरकारचे आता 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना विधानसभेत सडेतोड उत्तर दिले आहे. आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अशी वाट बघत पुढची पाच वर्ष तिथेच काढलीत तरी चालतील. तुम्हाला सगळे सांभाळून घ्यावे लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसे इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा, तुमच्या चुकीला माफी नाही असे म्हणत असा चिमटा अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना काढला.
तसेच मी लपून काही करत नाही, जे काय करायचे ते समोर करतो. तिथेही केले आणि सोडले, इथे आल्यावरही मजबूत बसलो आहे असे पवारांनी सुनाविले. सुधीर मुनगंटीवार कितीही म्हटले चुक झाली तरी आता माफी नाही असे सांगत अजित पवार यांनी शिवसेना-भाजपा युतीची शक्यता फेटाळून लावली.