हडपसर परिसरातील निराधार लोकांना मिळणार भोजन
खासदार डॉ.अमोल कोल्हे व जगदंब प्रतिष्ठाचा उपक्रम
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
हडपसर – (प्रतिनिधी)
लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या हडपसर व परिसरातील दिव्यांग, अनाथ, हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना मोफत भोजन देण्यात येणार आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’ आणि लॉन्ड्री स्मार्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील कंपन्या बंद झाल्या. तसेच इतर छोटे-मोठे व्यवसाय थंडावले. त्यामुळे हातावर पोट असणारे रोजंदारीवर काम करणारे कामगार, अपंग, अनाथ तसेच होस्टेलवर राहणारे विद्यार्थी आणि गरजू गरीब व्यक्तींना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा मदत करीत असल्या तरी गरजूंची संख्या मोठी असल्याने अनेकांनी खासदार डॉ. कोल्हे यांनी उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी हडपसर परिसरात मोफत भोजन देण्यासाठी आपली यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला.
या गरीब कष्टकरी, कामगार, विद्यार्थी आणि गरजूंना मोफत भोजन देण्यासाठी आपली ‘जगदंब प्रतिष्ठान’ व लॉन्ड्री स्मार्ट या व्यावसायिकांच्या सहकार्याने मोफत अन्न पुरविले जाणार असून गरजूंनी ९६९७७९२४२४/७०७०७०१५१५/९८५०२६२९१८ आणि ९१७२२३०३८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.