पुणे (प्रतिनिधी)
कान्हेवाडी बुद्रुक येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त याच विषयावर सोशल मिडियावरून घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कमान (ता. खेड) येथील संजय नाईकरे यांनी प्रथम तर मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील लीनता गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. पुण्यातील हरिभाऊ काळे यांना तृतीय तर रमेश कोबल यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
संस्थेकडून दरवर्षी वसुंधरा दिन साजरा केला जातो. कोरोना व त्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम अथवा उपक्रम राबविता आला नाही. त्यामुळे संस्थेने घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली होती. फेसबुक व व्हाट्सएपच्या माध्यमातून स्पर्धेत विषयी माहिती प्रसारित करण्यात आली होती. स्पर्धकांनी त्यावरून घोषवाक्ये पाठविली होती. दोन्हीही माध्यमातून ४५ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेत संजय नाईकरे यांच्या “ह्रदयाच्या शेतामध्ये पृथ्वी लावू या, प्रेम सिंचूनी वसुंधरेला सारे जगवू या’ या घोषवाक्याला प्रथम क्रमांक मिळाला. “वसुंधरेचे रक्षण, हेच आपले संरक्षण’ या श्रीमती गायकवाड यांच्या घोषवाक्याला द्वितीय तर काळे यांच्या ” माता वसुंधरा करिते पालन-पोषण, का बरे तीचे मग आपणच खरावे शोषण ?’ या वाक्याला तृतीय क्रमांक मिळाला. रमेश कोबल यांच्या “झाडे श्वास, झाडेच जीवन, झाडेच राखतात पर्यावरण संतुलन’ या घोषवाक्याला उत्तेजनार्थ जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना लॉकडाऊन उठल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल यांनी दिली.