पुणे ः प्रतिनिधी
कोरोना व्हायरच्या संसर्गाची भीती दिवसेंदिवस गडद होत आहे. कोरोनाबाधितांबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये थांबणे सर्वांच्या हिताचे आहे. भाजीपाला, दूध, औषधालये, रुग्णालये अशा अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्याचा गैरवापर करू नये. मात्र, बिनकामाची डोकी काही तरी बहाणा करून रस्त्यावर येत असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे पोलिसांना कामाचा व्याप वाढत आहे. पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी प्रत्येकाने घरामध्ये थांबणे सर्वांच्या हिताचे आहे, असे मत शिवसेना शिवअंगणवाडी पुणे जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी व्यक्त केले.
पठारे म्हणाल्या की, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मात्र एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहर आणि उपनगरातील मार्केट, तसेच लगतच्या गावातील आठवडे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे लॉकडाउन सुरू झाल्यापासून मार्केट बंद असल्याने काही भाजीपाला विक्रेते टेम्पो, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवर घेऊन विक्री करत आहेत. या विक्रेत्यांकडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सर्रास सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे. अनेकजण तर एकाच भाजीपाला विक्रेत्यासमोर शेजारीशेजारी बसून भाजी घेताना दिसत आहेत. तोंडाला मास्क सुद्धा बांधत नाहीत. भाजीपाला विक्रीसाठी येताना खासगी दुचाकीही घेऊन नागरिक येत असल्यामुळे त्यामुळे गर्दीत भरच पडत आहे, हेसुद्धा आता थांबले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.