नवी दिल्ली – सार्वजनिक कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 25 पैशांची, तर डिझेलच्या दरात 21 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या 3 आठवड्यांत पेट्रोल 9 रुपये 12 पैशांनी, तर डिझेल 11 रुपयांनी महागले.
दोन्ही इंधनांच्या किमतीत दररोज बदल करण्याच्या धोरणाला 82 दिवस स्थगिती देण्यात आली होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून सुरू केली. तेव्हापासून सलग 21 दिवस डिझेलची दरवाढ झाली. तर, एक दिवसाचा खंड पडल्याने पेट्रोलच्या दरात 20 दिवस वाढ झाली. त्या सत्रामुळे दिल्लीत मागील काही दिवसांपासून डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा अधिक नोंदला गेला आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोलचा दर 80 रुपये 38 पैसे, तर डिझेलचा दर 80 रुपये 40 पैसे इतका आहे.
सार्वजनिक कंपन्यांकडून केली जाणारी दरवाढ संपूर्ण देशात लागू आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येक राज्यात स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) वेगवेगळा दर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत त्या इंधनांचे दर भिन्न आहेत.