भोपाळ – भारत-चीन संघर्षावरून काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. विदेशी महिलेचा मुलगा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या कि, काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचे नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोवळ आली होती. यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या छळामुळे आपली प्रकृती ढासळली. दृष्टीही कमकुवत झाली असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी सांगितले होते. तब्बल 9 वर्षे झालेल्या छळामुळे झालेल्या अनेक इजा पुन्हा उफाळून येत आहेत. डोळ्याला आणि मेंदूमध्ये पाणी व्हायला लागले आहे. त्यामुळे आपली डाव्या डोळ्याची दृष्टी कमकुवत व्हायला लागली असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.