नाशिक : राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून 50 लाख मेट्रिक टन युरिया साठा शासनातर्फे उपलब्ध करून दिला आहे व जिल्हा आणि तालुकानिहाय त्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, कोणत्याही शेतकरी बांधवाला त्याचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे साप्ते कोणे येथे माजी मुख्यमंत्री कै. वसंराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह ‘ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात 1972 साली झालेल्या दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी केली, त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते संबोधले जाते. रोजगार हमी योजनेची सुरवात करून त्यांनी बेरोजगार शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध केला. तसेच अन्नधान्याने संपन्न असलेला महाराष्ट्र हे त्यांचे स्वप्न त्यांनी खरे केले. कसेल त्याची शेती हा कायदा व फळबाग लागवड योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाल्याचे भुसे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भुसे म्हणाले, यंदाच्या वर्षी ‘पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ’ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असून 01 जुलै ते 07 जुलै या दरम्यान होणाऱ्या सप्ताहात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यातून दर्जेदार बियाणे, खतांचा सुयोग्य वापर, आधुनिक औजारांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, कापूस बोंड अळी, मका पीकावरील नवीन लष्करी अळी, पौष्टीक तृणधान्य भित्तीपत्रके, जमीन आरोग्य पत्रिका माहिती पुस्तिका, शेतीशाळा वर्ग कार्यपध्दती पुस्तिका, विविध योजना यशोगाथा, कोरोना काळात घ्यावयाची काळजी या प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कोरोना साथरोगाराच्या काळात देशभरात लॉकडाऊन असताना या संकट काळात सर्वांचा पोशिंदा हा बळीराजाच होता. या प्रतिकूल परिस्थितीतीत अडचणीचा सामना करून सर्वापर्यत अन्नधान्य, भाजीपाला पोहचविण्यात तो अग्रेसर होता. याची जाणीव ठेवून समस्त जनतेने शेतकऱ्याविषयी आदर बाळगावा. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा बळीराजा प्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन भुसे यांनी केले.
कार्यक्रमात मंत्री भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सिताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूधन भारस्कर, विश्वास चव्हाण यांचा रिसोर्स बँक म्हणून प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. ही रिसोर्स बँक शासनाच्या योजनांचा लाभ घेवून इतर शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचे काम करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेअंतर्गत शेतमाल, गटशेती, शेतमालाचा साठा, शीतगृह, शेतमालाची वाहतुक याचे सुयोग्य नियोजन करून माल थेट ग्राहकाच्या हाती जाईल. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गटशेती व फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांचे मोठे जाळे उभारण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तालुक्यात कार्यरत असलेली महिला शेतीशाळा या उपक्रमाचे विशेष कौतुक करत आगामी काळात 25 टक्के महिलांचा सहभाग शेतीशाळेत असावा, कारण एक भगिनी मागे एक कुटुंब शिकणार असल्याने प्रगती साधली जाणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले. राज्यात कृषी विभागामध्ये नाशिक कृषी विभागाची कामगिरी भरीव स्वरूपाची असून राज्यात नाशिक विभाग अव्वल असल्याचे सांगत त्यांनी सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.
तत्पूर्वी भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये धोंडेगाव येथील काळू बेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी अचानक भेट देवून त्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल -रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनतर किशोर पवार या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या मदतीने उभारलेल्या शेडनेडची पाहणी त्यांनी केली. तसेच हिरामण ठाकरे या शेतकऱ्याने मनरेगा अंतर्गत उभारलेल्या शेततळे व फळबाग याचीदेखील पाहणी त्यांनी केली. त्यांनतर एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भात रोपांची लागवड देखील त्यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.