पुणे (प्रतिनिधी)
टाळेबंदीमुळे गावाकडे निघून गेलेल्या कामगारांनी अद्याप परतीचा मार्ग स्वीकारला नसल्याने उद्योगनगरीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी लहान, मोठय़ा उद्योगांनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. वाहन उद्योगातील अग्रेसर असणाऱ्या टाटा मोटर्समध्येही कामगारांची उणीव भरून काढण्यासाठी जाहिरात देऊन हंगामी कामगार भरती सुरू करण्यात आली आहे.
करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे औद्योगिक क्षेत्राची अवस्था कंबरडे मोडल्याप्रमाणे झाली आहे. हळूहळू निर्बंध शिथिल होत गेल्यानंतर शहरातील उद्योगधंदे सशर्त सुरू करण्यात आले. त्यानंतर, गेल्या महिन्याभराच्या काळातही उद्योगविश्वाची विस्कटलेली घडी पुन्हा बसलेली दिसून येत नाही. खाण्यापिण्याचे हाल होऊ लागल्याने आपापल्या गावी निघून गेलेल्या कामगारांची इतक्यात परतण्याची मानसिकता नाही. त्यामुळे कंपन्यांना अपुरे मनुष्यबळ ही सर्वाधिक अडचण भेडसावते आहे.
अशीच मनुष्यबळाची उणीव भासू लागल्यानंतर टाटा मोटर्सने जाहिरात देऊन २८ जूनपासून हंगामी कामगारांची भरती सुरू केली आहे. ती ५ जुलैपर्यंत चालणार आहे. फिटर, मोटार मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पेंटर, शीटमेटल वर्कर, वेल्डर, मशीन ऑपेरटर, ग्राइंडर आदी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. कंपनीने पुणे जिल्ह्य़ात राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत थेट मुख्य प्रवेशद्वारावर बोलावले आहे.
कामगारांना चहाऐवजी आयुर्वेदिक काढा
शहरातील टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर टाटा मोटर्सचे कामकाज सुरू झाले. कंपनी कामगारांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती कंपनीने यापुढेही कायम ठेवली असून त्या अॅपवर कामगारांचे सुरक्षित असल्याचे स्टेटस आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कामगारांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना चहाऐवजी आयुर्वेदिक काढा देण्याचे धोरण कंपनीने २६ जूनपासून अवलंबिले आहे. आलं, गूळ, लवंग, दालचिनी, तुळशीची पाने, काळी मिरी आदींचा काढय़ात समावेश आहे.