मुंबई: उद्योगपती रतन टाटा नेहमीच समाजोपयोगी कामात पुढे असतात. पुन्हा एकदा Covid संकटात महाराष्ट्राच्या मदतीला ते धावून आले आहेत. राज्याच्या प्लाझ्मा प्रकल्पासाठी मदत म्हणून 10 कोटी रुपयांचं साहाय्य टाटा उद्योगसमूहाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेला सुपूर्द केलं. याशिवाय 100 व्हेंटिलेटर्स आणि 20 अँब्युलन्सही टाटा समूहाकडून देण्यात आल्या आहेत.
याअगोदरही Coronavirus च्या उद्रेकाच्या पहिल्या टप्प्यातच टाटा उद्योग समूहाकडून भरभक्कम मदत देण्यात आली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आणि तब्बल 500 कोटींची मदत देणार असल्याचं त्यांनी मार्चमध्येच जाहीर केलं होतं. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असंही रतन टाटांनी म्हणाले.
आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला ही मदत देण्यात आली.
टाटांच्या मदतीवर समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोरोनासारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समूह सुरुवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहीला आहे.”
समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळी यश नक्की मिळतं. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.