मुंबई: राज्यात काही मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोरोनाचा राजभवनात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईतील राजभवनात 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) त्यांची पुन्हा चाचणी करणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यानंतर स्वत:ला अलग ठेवले आहे.
राज्यपालांच्या निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. एवढे कर्मचारी एकदम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी क्वारंटाईन झाले आहेत. आता राजभवनात कुठल्याही बाहेरील व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
8 दिवसांपूर्वी राजभवनामधील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्या संपर्कात 24 अधिकारी-कर्मचारी आले होते. या सर्वांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं. तसेच त्यांच्यामध्ये विशेष लक्षण आढळलेली नाहीत. यानंतर राजभवनाच्या वतीने कार्यालयातील शंभर लोकांची कोरोना चाचणी विविध रुग्णालयांमध्ये करण्यात आली. या चाचणीमध्ये 14 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. या अधिकारी – कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात येईल का? तसंच ज्यांची घरं लहान आहेत, त्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्याचा हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.
आज दिवसभर राजभवन आणि परिसरात बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी राज भवनामध्ये दाखल झालेले आहेत.