कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, ‘धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं एकही वृत्त वाचनात , पाहण्यात आलं नाही. मात्र WHO ने जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले. माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, RSS चं हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरात आहे. त्यामुळे संघस्वेयंसेवकांनी तिथे जावं, त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचं काम करावं, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल’
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
धारावीत झालेल्या कोरोना नियंत्रणाचं सगळं श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.
‘धारावीत सरकारने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुकच आहे. मात्र, धारावीतील परिणाम सरकारने काम केल्याने झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केलं. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटलं ते महानगरपालिकेला सांगितलं. त्यांनी हे काम नगरपालिकेच्या मदतीनेच केलं. पण हे सर्व श्रेय सरकारचं बनण्याचं कारण नाही.’
WHO कडून धारावीची दखल
‘धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले’, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.
मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वॉर्ड ऑफिसर्स आणि धारावी, वरळीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना याचं श्रेय दिलं आहे.