मुंबई : – राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या कालावधीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मध्यस्थी करून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देईल असा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेते करत होते, असंही शरद पवार यांनी म्हटलं. मात्र, आपण पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या खास मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. या मुलाखतीचे तीन भाग प्रकाशित करण्यात आले असून आजचा तिसरा आणि शेवटचा भाग प्रकाशित करण्यात आला. यामध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसंदर्भातील खुलासा केला आहे.
2019 ला राज्यात जे तीन पक्षांचं सरकार बनलं आहे. त्या सरकार स्थापनेच्या दरम्यान किंवा त्याआधी सुद्धा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असा उल्लेख करत फडणवीस यांनी ते भाजपाबरोबर सरकार बनवण्यासंदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा करत होते. नंतर पवारांनी अचानक यू-टर्न घेतला, असा आरोप केला, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांबरोबर माझे चांगले संबंध असल्याने राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल अशी राज्यातील नेत्यांची अपेक्षा होती. यासंदर्भात चर्चा होताना भाजपने सत्ता स्थापनेत आम्हाला शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही असं सांगितल्याचा खुलासा पवार यांनी केला आहे.
तो निरोप माझ्या कानावर आला
साधी गोष्ट आहे की शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये येऊन आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या असं भाजपाचे काही नेते लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही नेत्यांनी आणि माझ्याशीही एक दोन वेळा नाही तीन वेळा बोलले. बोलले नाहीत असं नाही याबद्दल बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांची अपेक्षा होती की पंतप्रधान आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मी त्यांना समर्थन देईल. हा निरोप माझ्या कानावरही आला होता, असं शरद पवार म्हणाले.
मोदींच्या चेंबरमध्ये गेले आणि सांगितले…
देशाच्या प्रधानमंत्र्यासमोर आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: संसदेमध्ये पंतप्रधानांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमल्यास आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवू किंवा विरोधात बसू. पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही असं मी त्यांना सांगून आलो, असे शरद पवार यांनी सांगितले.