पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांची संख्या ८ हजारांच्या वर पोहचली आहे. दररोज शेकडो जण बाधित आढळत आहेत. या दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील मुक्ताबाई हिरामण पांचाळ या ९० वर्षीय आजीबाईंनी करोनाच्या आजारावर मात केली असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलेला आहे. या आजीबाई बऱ्या होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी परिसरात रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मुक्ताबाई पांचाळ यांनी करोनावर मात केली आहे. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलामुळे त्यांना करोनाची बाधा झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डिस्चार्ज दिल्यानंतर राहत असलेल्या ठिकाणी स्थानिक आणि घरातील व्यक्तींनी त्यांचे जंगी स्वागत केले. तर घरातील व्यक्तींनी औक्षण करून प्रोत्साहन दिले.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मात्र, रुग्ण वाढत असले तरी शेकडो जण करोनामुक्तही होत आहेत. दरम्यान, करोनाविषयी नागरिकांच्या मनात अधिकच भीती असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु, काही महिन्यांच्या नवजात बालकापासून ९० वर्षांच्या वृद्ध व्यक्तींनी करोनाच्या आजारावर मात केली आहे. यामुळे आता करोनाविषयीची ही भीती कमी होण्यास मदत होणार आहे.