नवी दिल्ली : देशांत गेल्या 24 तासांत नवे करोनाबाधित 34 हजार 884 सापडले. 30 हजाराचा टप्पा पार करण्याचा हा सलग तिसरा दिवस होता. त्यामुळे देशातील एकूण बाधितांची संख्या दहा लाख 38 हजार 716वर पोहोचली आहे. सहा लाख 53 हजार 750 बाधित ठणठणीत झाले आहेत. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 26 हजार 273 वर गेली आहे.
एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे 671 जण मरण पावले. दरम्यान, तज्ज्ञांच्या अनुमानानुसार 11 ऑगस्टपूर्वी देशांतील बाधितांची संख्या 20 लाखांचा टप्पा ओलांडेल. सध्या देशात तीन लाख 58 हजार 592 सक्रिय बाधित आहेत. तर 62.94 टक्के बाधित पूर्णत: बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केल आहे.
मात्र, पुढील दहा लाख बाधितांचा टप्पा येत्या तीन आठवड्यात गाठला जाण्याची शक्यता आहे, असे भाकित आरोग्य अर्थतज्ज्ञ रिजो एम. जॉन यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारत 20 लाख बाधितांचा टप्पा 10-11 ऑगस्ट रोजी ओलांडेल. तर 30 लाख बाधितांचा टप्पा 28-29 ऑगस्ट रोजी ओलांडेल.
31 ऑगस्टला भारतात 32 लाख बाधित असतील. वाढीचा वेग लक्षात घेऊन हे अनुमान काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात 22 जुलैच्या सुमारास 10 लाख बाधित असतील असा अंदाज त्यांनी 8 जून रोजी मांडला होता. भारताने ही संख्या 16 जुलैला ओलांडली.