पिंपरी-चिंचवड

भाजपला शेतकऱ्यांचा कळवळा : दुधाला अनुदान देण्याची मागणी : तहसीलदारांना दूध पिशवी, पावडर भेट

दुधाला अनुदान देण्याची मागणी : तहसीलदारांना दूध पिशवी, पावडर भेट

पिंपरी – दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालय येथे भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते तहसीलदार गीता गायकवाड यांना दूध पिशवी व दूध पावडर भेट देवून निवेदन देण्यात आले. मात्र सत्तेत असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपचा आज अगदी विरोधी चेहरा शहरवासियांना पहायला मिळाला.

हे निवेदन देताना भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिं. चिं. मनपा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित गोरखे, शहर संघटक अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, ऍड.मोरेश्‍वर शेडगे, बाबू नायर, राजू अनंत दुर्गे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये 150 लाख लिटर दूध उत्पादित होते. लॉकडाऊन काळात दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्के घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. सद्यस्थितीत खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध 20 ते 22 रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दूध 25 रुपये प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. मात्र इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.

तसेच न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधव 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याकरिता शेतकऱ्यांच्या जोडधंद्यातील उत्पन्नवाढीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यापैकी शेतकऱ्यांचा दूधविक्रीचा व्यवसाय महत्वाचा मानला जातो. मात्र, राज्यात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांना दूधदरासाठी लढा द्यावा लागला होता; मात्र फारसे काही पदरात पडले नाही, याची आठवण मावळातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी करुन दिली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x