पुणे

खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करा : भाजपच्या शिष्टमंडळाची आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी

पुणे :  – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर भाजप प्रभारी गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मुळीक म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांपासून शहरातील महापालिकेची सुरू झालेली आणि अर्धवट असलेली विकासकामे खोळंबली आहेत. त्यामध्ये मेट्रो, भामा आसखेड प्रकल्प, समान पाणीपुरवठा, बसेसची खरेदी, विविध ठिकाणी उड्डाणपूल, चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प, शिवणे-खराडी नदीपात्रातील रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, आंबील ओढा पुनर्विकास, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, समाविष्ट गावांतील विकासकामे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, र्इ लर्निंग प्रणाली या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी केली आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘कोरोना शी सक्षमपणे लढता यावे यासाठी केंद्र सरकारने राज्याला २८ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. विविध समाजघटकांच्या कल्याणकारी योजनांबरोबर आपत्ती निवारण निधीमध्ये १ हजार ६५१ कोटी आणि आरोग्यासाठी ४४८ कोटी असे २ हजार ५९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच दहा लाख पीपीर्इ किट, १६ लाख मास्क, औषधे अशी भरीव मदत केली आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमांतून कोरोना निवारणासंदर्भात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. राज्याने मात्र महापालिकेला केवळ तीन कोटी रुपयांचा निधी देऊन बोळवण केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकार सापत्न वागणूक देत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांची मदत करावी.’

खासदार बापट म्हणाले, ‘कोरोनाचा लढा केंद्र, राज्य, महापालिका अशा तीन पातळींवर लढावा लागणार आहे. केंद्राला राज्य सरकारला भरीव आर्थिक पॅकेज दिले असताना राज्य सरकार मात्र कुठलेच आर्थिक पॅकेज जाहीर करीत नाही. हातावर पोट असणारे कष्टकरी, श्रमिक, बाराबलुतेदार यांना जीवन कसे जगायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. शासनाने जास्तीत जास्त मदत करणारे आर्थिक पॅकेज जाहीर करावे.’

खासदार बापट पुढे म्हणाले, ‘पुणेकर हा केंद्रबिंदू मानून आम्ही कार्यरत आहोत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार मिळावेत, ते बरे व्हावेत यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची गरज आहे. ठिकठिकाणी कोव्हिड निवारण केंद्र निर्मिती करण्यात येत आहे. महापालिकेच्या माध्यमांतून आवश्यक असणारी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे उपलब्ध करून देत आहोत. खासदार निधीतून महापालिकेला ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदारानीही निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. हे करताना कुठलेही राजकारण केलेले नाही. करत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील विकासकामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.’

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x