पुणे : शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत तब्बल १० हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यापासून ६ ऑगस्टपर्यंत ६२ हजार २७ एवढय़ा रुग्णांपैकी ४६ हजार ६०६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण, करोनामुळे दगावलेले रुग्ण अशी आकडेवारी महापालिके कडून दैनंदिन स्वरूपात के ली जाते. त्यानुसार दहा जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीतील आकडेवारीचे विश्लेषण के ल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण बरे झाल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरात ९ मार्च रोजी करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला. मे महिन्यापर्यंत बाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. मे महिन्याच्या मध्यापासून करोनाबाधित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे १४ जुलै ते २३ जुलै या कालावधीत टाळेबंदी जाहीर करण्यात आली.
टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतरही सक्रिय बाधित रुग्णांची संख्या वाढतच होती. या दरम्यान अँटीजेन चाचण्या मोठय़ा प्रमाणावर सुरू के ल्यामुळे ही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. १० जुलै ते १६ जुलै या कालावधीत शहरात ७ हजार १६१ रुग्ण आढळून आले. तर या कालावधीत ४ हजार ७५५ रुग्ण उपचारानंतर घरी गेले. १७ जुलै ते २३ जुलै या कालावधीत बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ७३० तर रुग्ण बरे होण्याची संख्या ५ हजार ५७४ होती. २४ जुलै ते ३० जुलै या दरम्यान ९ हजार ३७२ बाधित रुग्ण तर ८ हजार ३० रुग्ण बरे होऊन गेल्याची नोंद महापालिके कडे करण्यात आली आहे. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत ८ हजार ६०० बाधित रुग्ण आढळले असून तब्बल १० हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिके च्या स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांमुळे उपचार होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्के वारी ७३. ७० टक्के असल्याचा दावा महापालिके च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.