राज्यातील जिम व्यवसाय सुरू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. तसेच जिम सुरू करण्याबाबत लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास जिम चालकांसह आंदोलनाचा इशाराही मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत लॅाकडाउन लागू करण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियम व अटींसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिम व्यवसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. परंतु, अनलॉक प्रक्रिया चालू होऊन देखील त्यांची निराशा झाली आहे. विरोधाभास म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच गरजेचा असून त्यासाठी जिम चालू असणे अत्यावश्यक आहे. मात्र, तरीही जिम व्यवसाय बंद आहे, ही मोठी शोकांतिका आहे. यावरून सरकार जिमबाबत किती गंभीर आहे याची कल्पना येते, अशा शब्दांत मनसेने जिम व्यावसायिकांची व्यथा मांडण्याचा तसेच सरकारच्या कोडींत टाकणाऱ्या भूमिकेवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.