मद्यपान करून बडबडनं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण खेड मधील शिरोलीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडावरून दिसून येतं. मागील आठवड्यात शनिवारी पिंपळे गुरव परिसरातील दोघांचा खून खेड परिसरात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बजरंग जाधव आणि निरंजन गुरव अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडाचा थेट संबंध आक्या बॉण्ड टोळीशी लावण्यात आला आहे. टोळीतील सक्रीय सराईत गुन्हेगार अनिकेत रणदिवे याचा मे महिन्यात खून झाला होता. तो खून मृत तरुणांनी मद्यपान करून आम्ही केल्याची बढाई मारली आणि तेच त्यांच्या जीवावर बेतलं, यापैकी एकाने मृत अनिकेत रणदिवेच्या भाऊ मुख्य आरोपी सूरज रणदिवेला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्याने मित्रांसह शिरोलीत येऊन मित्रांच्या मदतीने या दोघांचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केला.
या प्रकरणी मंगळवारी चिखली पोलिसांनी खेड शिरोली हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरज प्रकाश रणदिवे आणि किरण चंद्रकांत बेळामगी (दोघेही राहणार घरकुल) यांना जेरबंद केले आहे. तसेच, अधिकच्या तपासासाठी खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी या अगोदर तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. अद्याप चार आरोपी फरार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे.
खेड मधील शिरोली परिसरात शनिवारी पिंपरी-चिंचवडमधील बजरंग आणि निरंजन या दोन तरुणाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून करण्यात आला होता. त्यांचा मुतदेह रक्ताच्या थारोळ्यात झाड झुडपात पडलेला आढळला होता. शिवाय त्यांच्या मृतदेहाशेजारी मद्याच्या बाटल्या, गांजा आदी वस्तू आढळल्या होत्या असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी खेड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी सूरज प्रकाश रणदिवे हा त्याच्या साथीदारांसह चिंचवड बस स्थानकात येणार असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सूरजने हत्येची कबुली दिली असून चिखली पोलिसांनी आरोपींना खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत निरंजन आणि बजरंग हे दोघे शिरोलीत मित्रांसोबत मद्यपान करत होते. तेव्हा, आम्हीच अनिकेत रणदिवे याचा खून केला असे नशेत ते बडबडले. यानंतर तेथील एकाचा फोन मृत अनिकेत रणदिवेचा भाऊ व मुख्य आरोपी सूरज रणदिवेला आला, तुझ्या भावाचा खून या दोघांनी केला असल्याचे त्याला सांगण्यात आले. हे समजल्यानंतर संतपालेल्या सूरजने आपला साथीदार किरणला सोबत घेऊन शिरोली गाठली व नंतर तेथील मित्रांच्या मदतीने मागचा पुढचा विचार न करता थेट तीक्ष्ण हत्यारांनी वार करून निरंजन आणि बजरंग यांचा खून केला. या घटनेनंतर त्या ठिकाणाहून नऊ जणांनी पळ काढला. यापैकी, पाच जण खेड पोलिसांच्या ताब्यात आहेत.
अनिकेत रणदिवेचा खून कधी झाला –
आक्या बॉण्ड टोळीतील सक्रीय सदस्य आणि मास्टरमाइंड म्हणून सराईत गुन्हेगार अनिकेत रणदिवे याची ओळख होती. तोच टोळीचा कणा होता असं पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. आक्या बॉण्ड टोळीने वर्चस्ववादातून अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला केला होता. त्याचा बदला घेत २९ मे रोजी प्रतिस्पर्धी अमित चव्हाण टोळीने सराईत गुन्हेगार अनिकेत रणदिवे याचा खून केला होता. या प्रकरणी सर्व आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली होती.
कुख्यात आक्या बॉण्ड टोळीवर १८ गंभीर गुन्हे –
सराईत गुन्हेगार अनिकेत रणदिवे हा आक्या बॉण्ड टोळीचा मास्टरमाइंड आणि सक्रिय सदस्य होता. आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय-१९), विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय-२२), शोएब इजराईल शेख (वय-१९), विशाल रामधन खरात (वय-२०) यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदार असे टोळीचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत टोळीवर १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न असे गुन्हे यांच्यासाठी किरकोळ आहे. अंमली पदार्थाची नशा करून चोऱ्या करणे, दुकानदारांना लुटणे, मुलींची छेड काढणे असे अनेक गुन्हे या टोळीकडून घडले आहेत. पण अनेक जण आरोपींच्या भीतीने पोलिसांपर्यंत आलेच नाहीत. या टोळीवर नुकतीच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढ़े, पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर, चेतन सावंत, विपुल होले, बाबा गर्जे, संतोष सपकाळ,कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांच्या पथकाने केली आहे.