लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वीज बिलांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र त्या वीज बिलात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याने, अनेक नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील पर्वती शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यास नागरिकांकडून एक-एक रुपया गोळा करून चक्क सात हजाराची चिल्लर देऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
या सात हजाराच्या चिल्लरमुळे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटाची सर्वांना आठवण झाली. या अनोख्या निषेधाची सध्या शहरात एकच चर्चा सुरू आहे. शिवसेना सत्तेत असुनही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.
यावेळी पर्वती शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे म्हणाले की, करोना विषाणूमुळे सर्व बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आणि त्यात महावितरणकडून चुकीच्या पद्धतीने बील आकारले गेले आहे. त्या निषेधार्थ आम्ही नागरिकांकडून पैसे गोळा करून महावितरण अधिकार्यांना दिले आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांची बिले माफ करावी. अन्यथा भविष्यात शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.