पुण्यातील लॉकडाउन उठवण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध होता असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरेंचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सामना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
“पुण्यात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरेंचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं. पुण्यात घाईघाईने लॉकडाउन उठवला त्यालाही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. पण आता ते मुंबई पॅटर्न राबवत आहे. त्यात काही अडचणी असतील त्या दुरुस्त करुन जनतेला उत्तम सुविधा मिळतील याची जबाबदारी फक्त सरकार किंवा जनतेची नाही तर विरोध पक्ष म्हणून सगळ्यांची आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“पांडुरंग रायकर यांना उपचार मिळावेत यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांना जी हवी होती ती रुग्णवाहिका मिळाली नाही. यासंदर्भात सुद्धा सरकारनं यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे,” असंही यावेळी ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. करोना संकटात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडलं पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सतत होत आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखीच असल्याचं म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं,” असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. संयम बाळगणं गरजेचं आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
“सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवलं पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचं आहे हे माहिती असतानाही विरोध असं वागत असतील तर हे जनतेच्या हिताचं नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.