पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा देखील करोनामुळे मृत्यू झाला होता.
माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २७ जुलैला दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि १८ ऑगस्ट रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुन्हा २२ ऑगस्ट रोजी दत्ता एकबोटे आणि त्यांचा मुलगा रवींद्र यांना त्रास होऊ लागल्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
ससूनमध्ये दत्ता एकबोटे यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, तर रवींद्र एकबोटे यांची प्रकृती ससूनमध्ये दाखल करतेवेळी गंभीर होती. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रवींद्र यांचा ३१ तारखेला मृत्यू झाला. दरम्यान ससून रुग्णालयात दत्ता एकबोटे यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावली. मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. कोरेगाव पार्क येथील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी महापौर दत्ता एकबोटे हे चळवळीतले कार्यकर्ते होते. अतिशय गरिबीतून त्यांनी आपले स्वतःचे नेतृत्व उभा केले होते. समाजवादावर त्यांची अपार निष्ठा होती. त्यांनी एस एम जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य ,ग प्र प्रधान अशा दिग्गज समाजवादी नेत्यांबरोबर काम केलं होतं. तसेच आणीबाणीमध्ये देखील त्यांनी तुरुंगवास भोगला होता. तर आणीबाणीनंतर सुरुवातीच्या काळात जनता पक्षात, त्यानंतर काँग्रेस आणि तसेच पुढे जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाच्या कामात कार्यरत राहिले.