पुणे : – घरमालकाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देउन ५० लाखांची खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून पोलीसांनी व्हिडीओ असणारे ‘ते’ मेमरीकार्ड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चंदननगरमधील 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबत वडगावशेरी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे. वडगावशेरीत त्यांची इमारत असून दुसऱ्या मजल्यावर ते कुटूंबासह राहायला आहेत. आरोपी तरुण पत्नीसह त्यांच्याकडे भाडोत्री राहत होता.
कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर घरी नसताना आरोपीच्या पत्नीने फिर्यादीना मेसेज करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर आरोपीची पत्नी फिर्यादी यांना फोन करून सतत बोलत होती. तिने पुन्हा एके दिवशी फिर्यादी यांना घरी बोलवून घेतले. त्यावेळी आरोपी घरातच होता. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेत खोली सोडून दुसरीकडे राहायला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने फिर्यादीना फोन करून, तुमच्या संबंधाची मला माहिती होती. त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही लावून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण तुला पाठवतो आहे. तु राहत असलेल्या परिसरात तुझी आणि घरच्यांची इज्जत आहे. त्यामुळे मला ५० लाख रुपये देऊन प्रकरण मिटव. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल केला होता.
तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पैसे घेण्यासाठी आरोपी हा पुणे रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, कर्मचारी रमेश गरुड, सुनील चिखले, विजय गुरव, फिरोज बागवान, प्रदीप गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.