पुणे : COEP मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालयाची चोख व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने त्वरीत पाऊले उचलली आहेत. रुग्णालयाबाहेरील बाऊन्सर हटवून तिथे मनपाचे सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रूग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी येथील रुग्णांवरील उपचार, भोजन व्यवस्थेबाबतचे आदेश दिले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार नातेवाईकांना रुग्णांशी टॅब्लेट द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्काची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी दिली. तसेच सोमवारी जम्बोमधील 14 रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. महापौर मुरलीधर मोहोळ मंगळवारी सकाळी ११ वाजता जम्बो रुग्णालयाची पाहणी करून आढावा घेणार आहेत.
पाचवेळा जेवण –
जम्बो कोविड रूग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यासाठी गरजेनुसार आहारतज्ञांच्या सल्ल्याने पाचवेळा जेवण देण्यात येणार आहे. जेवणात उत्कृष्ट दर्जाचे अन्न देण्याच्या सूचना अग्रवाल यांनी दिल्या आहेत.
सौहार्दपूर्ण वागणूक-
येथील बाऊन्सर ऐवजी आता पुणे महापालिकेचे सुरक्षारक्षक व सुरक्षा अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना सौहार्दपूर्ण वागणूक देण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या आहेत, असे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
रुग्णांशी थेट व्हिडिओ कॉल
नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती दिवसातून तीनवेळा मिळणार आहे. यात दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता यावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार टॅबची व्यवस्था महापालिकेने केली आहे. आरोग्य कर्मचारी रुग्णाजवळ जाऊन हेल्पडेस्क येथील नातेवाईकाशी व्हिडिओ कॉल जोडून देतील. ही व्यवस्था करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.
14 रुग्ण करोनामुक्त
रविवारी एक आणि सोमवारी 14 असे एकूण 15 रुग्ण उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.
My web page – timbangan Semarang