राज्यात करोनामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाची स्थिती आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवरून विरोधक आक्रमक झालेले दिसले. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कडाडले. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचं लक्ष वेधत फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या मृत्यूविषयी चिंता व्यक्त केली. तेथील मृत्यूदराचं प्रमाण सांगत ते कोविड सेंटर आहे की, मृत्यूचं आगार, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थितीवर भाष्य करत सरकारच्या उपाययोजनांवर टीका केली. फडणवीस म्हणाले,”महाराष्ट्रात सातत्याने २० टक्के संसर्ग दर असून, देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर २५ टक्के होता. ही स्थिती भयावह आहे,” असं फडणवीस म्हणाले.
“आज आपण बघा, हे जम्बो कोविड सेंटर आपण काढले. हे जम्बो कोविड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे वारंवार बाहेर आलंय. बीकेसी कोविड सेंटरचा विचार केला, तर कालच मी वर्तमानपत्रात बातमी वाचत होतो. गेल्या महिन्यात तिथला मृत्यूदर ३७ टक्के आहे. म्हणजे कोविड सेंटर आहे की, मृत्यूचं आगार आहे. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मरत असेल, तर मग या कोविड सेंटरमध्ये नेमकं चाललं काय? कशा करीता आपण हे सुरू केलंय. ३७ टक्के दर कशाला म्हणतात. जगात कुठेही असा दर नाही. ३७ टक्के लोक कोविड सेंटरमध्ये येऊन मरत आहेत. ही अवस्था विदीर्ण अशी आहे. हे का होतंय, याकडे कुणी बघितलंय का?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.