पुणे:
भारतीय गणित आणि लोप पावत असलेले मराठी पावकी -निमकी सारखे पाढे या भारतीय गोष्टींचे कालानुरूप पुनरुज्जीवन करून सर्व देशात आणि परदेशात प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर आणि डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी प्रमुख मार्गदर्शक पदी काम करण्यास मान्यता दिली आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि संस्थेने ही समिती स्थापन केली असून याच उद्देशाने ‘अंक नाद ‘ हे ऍप ही निर्माण केले आहे .
या समितीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर ,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे ,(अध्यक्ष ,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ),तालयोगी सुरेश तळवलकर ,संगीतकार अशोक पत्की , प्राजक्ती गोखले (बालभारती च्या अभ्यास मंडळाच्या सदस्य ),प्रसाद मणेरीकर (संस्थापक ,अनुभूती नॉलेज सेंटर ),प्राची साठे ,प्रा .अनघा ताम्हणकर ,साक्षी हिसवणकर,चारुदत्त आफळे ,शोभा नेने (अध्यक्ष ,बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ ),मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट हे सन्माननीय सदस्य आहेत .
मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि. चे संस्थापक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
डॉ माशेलकर यांनी या मार्गदर्शक समितीच्या प्रमुख मार्गदर्शक पदावर काम करण्याचे मान्य केले आहे . ‘गणिताचे अस्तित्व सर्वत्र असून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने गणित समजावून सांगण्याचे अंक नाद चे प्रयत्न महत्वाचे असून त्यात संगीताचा प्रयत्न कौतुकास्पद आहे ‘ असे डॉ माशेलकर यांनी म्हटले आहे .