महाराष्ट्र

आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि अघोषित हुकमशाही नाही तर काय आहे ? – खासदार अमोल कोल्हे

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यानंतर गुरुवारी देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते जेव्हा हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले तेव्हा घडलेला प्रकार म्हणजे दडपशाही आणि हुकुमशाहीचंच उदाहरण आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर जेव्हा मी संसदेत करोना स्थितीबाबत बोलत होतो तेव्हा महाराष्ट्राबाबत बोला असे सांगण्यात येते. महाराष्ट्रात खुट्ट वाजलं की लगेच राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जाते. आता ते सगळे लोक उत्तर प्रदेशात एवढी मोठी घटना घडून गप्प का? देशात हे जे काही चाललं आहे ती दडपशाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि अघोषित हुकमशाही नाही तर काय आहे ? असाही प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीला मारहाणही झाली. तिची जीभही कापण्यात आली. या सगळ्या घटनेनंतर या तरुणीला दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर या मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार परस्पर केले असा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान हाथरस या ठिकाणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांना कुणालाही भेटू दिलं गेलेलं नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही गुरुवारी रोखण्यात आलं. राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप आहे. या घटनेचेही पडसाद देशभरात पाहण्यास मिळाले.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा आरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकार हे मराठा आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे असंही आश्वासन यांनी यावेळी दिलं.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x