महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलीच फिरकी घेतली. पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन पवारांना पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सरकार स्थिर असल्याचे सांगतानाच पवारांनी खास त्यांच्या शैलीत पाटलांना टोला लगावला.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार लवकरच जाईल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना पवारांनी, “त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, आताचे सहा महिने गेले आहेत. आणखीन साडेचार वर्षे त्यांना वाट पहावी लागेल,” असं उत्तर देत राज्यातील सरकार स्थिर असल्याचे संकेत दिले. मात्र पुढे बोलताना त्यांनी, “मला वाटत ते (भाजपाचे नेते) रात्री कपडे घालूनच तयार असतात” असा खास शैलीतील टोलाही लगावला.
पाटील नक्की काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं २८ सप्टेंबर रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. “पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं.
भाजपा अजूनही सत्तेचं स्वप्न पाहतं आहे
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपा सत्तेचं स्वप्न अजूनही पाहतं आहे असं उत्तर दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते भाजपात गेले होते ते आता परत आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. त्यांना थोपवण्यासाठी भाजपाकडून असे दावे केले जात आहे. तिन्ही पक्षांमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि तिन्ही पक्षांचं सरकार बळकट स्थितीत आहे असंही मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.