पुणे : – पुण्यातील 21 वर्षीय नृत्यगंणा विशाखा काळे यांनी नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा या नृत्यगंणा होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी त्या नृत्याचे शो करत होत्या. दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. यात त्यांच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. यामुळे देखील त्या घरी असत. त्यांना शो करता येत नव्हते. तर त्यांचे फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याचे स्वप्न होते. मात्र अपघात झाला आणि घरी बसावे लागले. त्यातच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सर्व ठप्प झालं. आधीच अपघातामुळे घरी राहून गेले आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचे कार्यक्रम कमी झाले. काही दिवसांनी कार्यक्रम होणे पूर्णपणे बंद झाले आणि नवीन कार्यक्रम मिळत नव्हते. यामुळे त्या नैराश्यात होत्या.
हडपसरमधील गोंधळे नगर भागात छोट्या घरात रहात काळे कुटुंबिय राहत होते. त्यांची परिस्थिती हालाकीची होती. त्यांना एक छोटी बहीण होती. त्याही नृत्य करायच्या. तर त्यांची आई एका खासगी शाळेत शिपाई कामे करत होत्या. त्यांचे वडील मोहन काळे हे अंध आहेत. त्यांच्यावरच घर अवलंबून होते. त्यांच्या जाण्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.