शहरातील विविध भागातील दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन सराईत वाहन चोरीच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून तब्बल 19 लाखांच्या 27 दुचाकी आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
कार्तिक प्रकाश भुजबळ, योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या (दोघेही रा. लोणी काळभोर), अभिषेक अनिल भडंगे (रा. हडपसर) निलेश मधुकर आरते (वय 23 रा. हडपसर) आणि संजय हरीश भोसले उर्फ सोन्या (रा. शेवाळवाडी हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शेवाळवाडी फाटा परिसरात कार्तिक, योगेश आणि अभिषेक एका दुचाकीवरुन येताना पोलिसांना दिसले. पोलिसांना त्यांचा पाठलाग करुन पकडले. चौकशीत त्यांनी 8 लाख 20 हजार रुपयांच्या 15 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
दुसऱ्या घटनेत हडपसर पोलिसांनी दोघा सराईतांना फिल्मी स्टाईल पाठलाग करुन अटक केले. त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी 9 लाख 10 हजारांच्या 10 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, सहायक पोेलीस निरीक्षक संजय चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, श्रीकांत पांडुळे, शशिकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहिद शेख, निखिल पवार, प्रशांत दुधाळ, उमाकांत स्वामी, सचिन जाधव, पाटील, सोनवणे यांच्या पथकाने केली.