पुणे

राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र शिरुर लोकसभा मतदारसंघात, प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र शिरुर लोकसभा मतदारसंघात उभारण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या केंद्रासाठीचा डीपीआर तयार करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.

भिमाशंकरचे अभयारण्य आणि खेड, जुन्नरच्या आदिवासी क्षेत्रात यामध्ये गुळवेल, हिरडा यासह असंख्य वनौषधी आहेत. या भागात वनौषधी व लागवडीसाठी बराच वाव आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळू शकेल. त्यामुळे या भागात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सदर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर तयार करणे, जागा निश्चित करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे आदी कामांसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख व आयुष उपसंचालक श्री. दिगंबर मोकाट, श्री. ए. बी. आढे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे नियोजन अधिकारी स्वप्निल कोरडे, संकेत तोंडारे, शुभांगी फुले (तहसीलदार सर्वसाधारण शाखा), जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर व प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आदी बाबींसाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याकरिता सर्व संबंधितांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र आपल्या भागात होणे ही मोठी बाब असून त्याचा मोठा लाभ आदिवासी समाजाला तर होईलच परंतु आयुर्वेदाच्या संशोधनासाठी त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्तरावर याचा पाठपुरावा करणार आहोत, असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x