मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृती दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर आज ११.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मास्क, शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
यंदाच्या स्मृतीदिनाला वेगळी राजकीय पार्श्वभूमी मिळाली आहे. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री पदी विराजमान झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आजपर्यंतची भाजपसोबतची साथ सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे.