भांडवली बाजारातील गेल्या काही सलगच्या सत्रतेजीमुळे बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्याने अडीच लाख कोटी डॉलरचा टप्पा पार केला आहे.
नोव्हेंबरपासून बाजारमूल्यात २० टक्कय़ांनी (४४० अब्ज डॉलर) वाढ झाली. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेल्या समभाग खरेदीमुळे ही वाढ झाल्याचे मत नोंदविण्यात येत आहे.
कंपन्यांचे बाजारमूल्य २३ मार्च २०२० ला १.३ लाख कोटी डॉलर या नीचांकावर आले होते. त्या नीचांकापासून बाजारमूल्यात आतापर्यंत ९१ टक्के वाढ झाली आहे. चालू आठवडय़ाच्या सुरुवातीला जागतिक बाजारपेठेने १०० अब्ज डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला. या माध्यमातून बाजाराचा एक मैलाचा दगड पार झाला होता. मार्चमध्ये जागतिक बाजारचे मूल्य ६२ लाख डॉलपर्यंत खाली आले होते.
गेल्या आठ महिन्यांत एकूण विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय भांडवली बाजाराने लक्षणीय वृद्धीदर राखला आहे. गेल्या आठ महिन्यांत भारतीय बाजाराचे मूल्यांकन उंचावले असून मार्चच्या तुलनेत सध्या बाजाराचे मुल्यांकनात दुप्पटीने वाढ झाली आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी बाजारात समभाग खरेदीचा सपाटा लावला.