कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या सत्तेतील तिन्ही पक्षांनी आपली पक्षीय बांधणी भक्कम करण्यावर जोर दिला आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक लागली तरी आपली बाजू भक्कम असली पाहिजे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये बेरजेच्या राजकारणावर जोर दिला जात असून जुळवाजुळव केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या साऱ्याच पक्षांनी बेरजेच्या राजकारणावर भर देत आपापली संघटना वाढविण्यावर भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने, सहकारी संस्था, गोकुळसारखी संस्था अशा विविध निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. या साऱ्याच निवडणुका सर्वच राजकीय पक्षांकरिता महत्त्वाच्या आहेत.
निवडणुकांचा हंगाम जवळ आल्यानेच जुळवाजुळव सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षात ऐक्याचे वारे वाहू लागले. सांगलीमध्ये मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसमधील काही जणांना पक्षात प्रवेश दिला. विटा येथील माजी आमदार सदाशिव पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह नऊ संचालक, युवक काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष अजित दुधाळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. येथे जयश्री पाटील याही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेरच्या क्षणी हा प्रवेश बारगळला होता. अशाप्रकारे राजकीय प्रवेश करण्यावर काँग्रेसकडून टीका झाली. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी ‘प्रत्येक पक्षाला, नेत्याला त्यांचा पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. याच वेळी आघाडी धर्माचे तत्त्वही पाळले पाहिजे,’ असा खोचक सल्ला प्रवेशासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला होता. या टीकेला जयंत पाटील यांनी धूप घातली नसल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादी वाद कृष्णाकाठी धुमसत राहिला.
राष्ट्रवादीची जुळवाजुळव
कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेच्या राजकारणावर भर दिला. जनसुराज्य पक्षापासून दुरावलेले माजी आमदार राजीव आवळे आणि संजयसिंह गायकवाड आणि संजीवनी गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीमध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांच्यानंतर मातंग समाजाचे उल्लेखनीय नेतृत्व उरले नाही. ही कसर भरून काढता येईल अशी पक्षाला शक्यता वाटत आहे. तर यानिमित्ताने अण्णा भाऊ साठे महामंडळावर वर्णी लागेल, असा आवळे यांचा कयास आहे. आवळे- गायकवाड पक्षप्रवेश माध्यमातून राष्ट्रवादी भक्कम केली जात असताना काँग्रेस व जनसुराज्यकडून मात्र कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुखांना काँग्रेसमध्ये आणण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्य़ात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना धक्का देणारे राजकारण महेश कोठे यांच्या माध्यमातून घडते आहे. माजी महापौर महेश कोठे हे शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ते राष्ट्रवादी प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी इन्कार केला होता. गेल्या आठवडय़ात त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जवळपास निश्चित होता. मध्येच माशी मध्येच शिंकली आणि कोठेंच्या हाती घडय़ाळ बांधायचे राहून गेले. कोठे यांना शिवसेनेतून काढले असल्याचे सांगितले आहे.
भाजपचा सावरायचा प्रयत्न
राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपची पश्चिम महाराष्ट्रातील शान पूर्वीसारखी उरली नाही. गेलेली पत मिळवण्याचा प्रयत्न आहे. पदवीधर- शिक्षक मतदारसंघातील पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. आता ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून कमळ फुलवण्यावर भाजपचा जोर आहे. यातून सावरायचा प्रयत्न भाजप करीत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा अधिक महत्त्वाचा आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात पक्षाला चांगले यश मिळावे म्हणून चंद्रकांतदादांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपची सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सत्ताबदल होताच भाजपला गळती लागण्याची शक्यता वर्तविली जाते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ताकद दाखविण्याची भाजपची योजना आहे.