आपला इतिहास जागतिक स्तरावर जाणे आवश्यक – सभापती रामराजे निंबाळकर
पुणे ,२२ जानेवारी —आपला इतिहास हा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रमाणावर उपयोग कारण्याप्रमाणे सोशल नेटवर्किंगचा प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी येथे व्यक्त केले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर प्रकाशित आणि डॉ केदार फाळके लिखित “छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती” या ग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ साहित्यिक आणि तत्वचिंतक प्रा. सदानंद मोरे, संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, लेखक डॉ. केदार फाळके उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने बुधभूषण ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यापुढील काळात संशोधनाची प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, गेल्या काही वर्षात सोशल नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. त्याच्या आधारावर आपण इतिहास जगामध्ये नेला पाहिजे. त्यासाठी जे जे सहकार्य लागणार आहे ते देण्याची माझी तयारी आहे असे त्यांनी सागिंतले.
श्री. बलकवडे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती सांगणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे ग्रंथाचे वेगळे महत्व आहे. उद्याच्या पिढीसाठी अशा स्वरूपाच्या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखन होणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक धोरणे आखली आणि ती प्रत्यक्षात आणली त्याचे विवेचन ग्रंथामध्ये सविस्तरपणाने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आले आहे. त्यामुळेच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणार आहे. डॉ. मोरे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून इतिहासाच्या पुर्नमांडणीचा करण्यात येणारा उपक्रम हा नक्कीचं स्वागतार्ह आहे. शालेय स्तरावरील पुस्तकांमध्ये इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. आता बौद्धिक पातळीवर होणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात अशा ग्रंथाची आवश्यकता आहे.
डॉ. फाळके यांनी मनोगतात पुस्तक लेखनामागची भूमिका मांडली तर श्री. पटवर्धन यांनी येत्या सहा महिन्यात पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली जाणार असल्याचे जाहीर केले. विश्वस्त प्रदीप रावत यांनी आभार मानले आणि निबंधक श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशन कार्यक्रमापूर्वी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची फिल्म दाखवण्यात आली.