पुणे दिनांक 22 –
येत्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावरच लढल्या पाहिजेत, त्याद्वारेच राज्यातील काँग्रेसची पक्षीय चौकट कायम राहील आणि कार्यकर्त्यांचा ओघही टिकवता येईल असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवले आहे. शिवरकर यांनी म्हटले आहे की काँग्रेस पक्षाकडे हजारो असे कार्यकर्ते आहेत की त्यांनी आजवर कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. अशा कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये पूर्ण संधी मिळावी आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे पंजा हे निवडणूक चिन्ह लोकांपुढे सतत राहावे यासाठी स्वबळाचा नारा अजमावणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्तेही स्थानिक पातळीवर सक्रिय होतात आणि त्यांच्या मार्फत पक्षही जिवंत राहतो त्यामुळे महाराष्ट्रात भविष्यकाळात काँग्रेस मजबूत करायची असेल तर स्वबळाचा नारा दिल्याशिवाय गत्यंतर नाही, असेही शिवरकर यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे