पुणे ः प्रतिनिधी
तळागाळातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून समाजाप्रती काम असले पाहिजे. स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या सुख-दुखामध्ये सहभागी होऊन काम करण्याची गरज आहे. सामान्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे, त्यांच्यावर आलेले संकट माझ्यावर आले आहे, या भावनेतून समाजाप्रती बांधिलकी ठेवून काम करणारा कार्यकर्ता निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी व्यक्त केले.
मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने पुणे शहर शिवसेना उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी विचारांची देवाणघेवाण संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चेतन मोरे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, शिवसेनेचे पुणे शहर संघटक राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
बालगुडे म्हणाले की, झोपडपट्टी, कष्टकरी, मजूरांनासुद्धा चांगले शिक्षण हवे आहे, निरोगी आरोग्य हवे आहे, चांगले घरदार असले पाहिजे, मान-सन्मान असला पाहिजे, अशी धारणा आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा अऩेकांचा दृष्टीकोन बदलला आहे. शाळांबाबतीत इंग्रजी-मराठी असा भेदभाव होऊ लागला आहे. कार्यकर्त्यांची भूमिका बदलू पाहात आहे. सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. अनेकांकडून विरोधासाठी विरोध केला जात नाही. गरज म्हणून विरोध करणारी मंडळी दुर्मिळ झाली आहेत. विचारवंतांच्या विचारांची देवाणघेवाण करत समाजाच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखाड करून चांगल्या विचारांची पेरणी करण्याचा आवश्यकता आहे. प्रत्येकाला चांगले शिक्षण देण्यासाठी राज्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक अशोक हरणावळ म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना सुख-दुःख समजून घेतली. दुःखदप्रसंगी धीर देण्यासाठी त्याला मदतीचा हात देण्यात मला मोठे समाधान वाटते. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारले आहे. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्राधान्यक्रमाने लक्ष दिले. पालिकेच्या शाळेतील गरिब मुलांना नवीन कपडे मिळाल्यानंतरचा आनंद पैशात मोजता येत नाही, त्यासाठी मी काम केले आहे. शिक्षक-पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद असावा यासाठी स्वतः शाळांमध्ये भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केला, त्याला यश मिळाल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चेतन मोरे म्हणाले की, समाजाप्रती बांधिलकी ठेवून प्रवास सुरू आहे. तळागाळातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबर त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न आहे. समाज सुधारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला चांगले शिक्षण देण्याची नितांत गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेचे पुणे शहर संघटक राजेंद्र शिंदे म्हमाले की, समाजामध्ये कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना नागरिक अनेक समस्यांचा पाढा वाचतात. सर्व समस्या सोडवू शकत नसलो, तरी बऱ्याच समस्या समजून सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समाधान वाटते. सामान्यांना धीर देत काम करतानाचे समाधान काही औरच असते, त्यांनी सांगितले.
मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, मागिल अनेक वर्षांपासून विचारवंतांना एकत्र आणून चर्चा घडविली जात आहे. त्यामुळे समाजासाठी दिशा देताना मार्ग सापडत आहेत. झोपडपट्टी आणि बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना दरवर्षी नवीन दप्तर, शालेय साहित्य आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना छत्री, इरले आणि अन्नदानाचा यज्ञ सुरू ठेवला आहे. माऊली-माऊली करीत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यात मनोमन समाधान मिळते, हे माझे भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले.