बेवारस महिलेला दामिनी झाली वारस
पुणे ः प्रतिनिधी
लक्ष्मीनगरमध्ये (बाटा गल्ली) येथील महिला उपचारासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये (गोटीराम भैय्या चौक) आली होती. अचानक ती चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला. दामिनी पथकातील महिला शिपायांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविल्याचे वलेकर व व्हनहुने यांनी सांगितले. दरम्यान, तिला कोणीही वारस नसल्याने दामिनी पथकातील महिला पोलीसच वारस झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
पोलिसांनी सांगितले की, समर्थ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दामिनी पथकातील वलेकर आणि व्हनहुने गस्तीवर होत्या. त्यावेळी त्यांना फडगेट पोलीस चौकीतून मार्शलचा कॉल आला, गोटीराम भैय्या चौक येथील जोशी हॉस्पिटलमध्ये महिला चक्कर येऊन पडली आहे. त्यावेळी आम्ही तातडीने घटनास्थळी जाऊन डॉक्टरांकडे विचारणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले. तिचे नातेवाईक कोणीही नसल्याचे समजले. तसेच मिठगंज पोलीस चौकीचे पोलीस शिपाई चव्हाण यांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठविले. मृत महिलेबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता रत्ना खरमनी (वय 45, रा. बाटा गल्ली, लक्ष्मीनगर, पुणे) असे समजले. ती आजारी असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते. दरम्यान, ती बाथरूममध्ये गेली आणि तेथेच चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, भरोसा सेल पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील समर्थ आणि खडक पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई एस. ए. वलेकर व महिला पोलीस शिपाई एस. पी. व्हनहुने यांनी ही कामगिरी केली.