पुणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. त्यातच खासगी रुग्णालयामध्ये कोविडची तपासणी केली, तर निगेटिव्ह आणि महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये तपासणी केली, तर पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे महापालिका की खासगी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा असा संभ्रम नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, हडपसर गावातील महिलेचे गर्भाशय पिशवी काढण्यासाठीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यासाठी कोविड तपासणी करून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याप्रमाणे महापालिकेच्या काळेपडळ येथील कोविड सेंटरमध्ये शनिवारी तपासणी केली, त्याचा रिपोर्ट सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल, तर कोविड रुग्णालयाच्या सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार करून घ्या. अन्यथा त्रास होत नसेल, तर औषधे घेऊन जा आणि घरामध्ये कोरोनटाइन व्हा, असे सांगितले. दरम्यान, कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला नाही, तर तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. मात्र, संबंधित रुग्णाने खासगी रुग्णालयातील कोविड तपासणी निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट पाठविला. निगेटिव्ह रिपोर्ट असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील आलेल्या रिपोर्टवर नागरिकांनी विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न पडला आहे.
——–