पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्राद्वारे हडपसर चे आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली. पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना वयोमानानुसार अथवा शारीरिक हालचालींना मर्यादा असल्याने केंद्रावर जाऊन लस घेणे अडचणीचे ठरू शकते. तसेच लसीकरणास आवश्यक प्रक्रिया पार पाडून लस मिळेपर्यंत लागणारा वेळ लक्षात घेता अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना ही प्रक्रिया गैरसोयीचे ठरू शकते. मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमानुसार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती वाहनातून थेट लसीकरण केंद्रावर येतात व गाडीत बसूनच त्यांना लस दिली जाते. याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेने अशी सुविधा सुरू करावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. पुणे मनपाने ही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तिंना कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्हणून उपयुक्त ठरणारी ड्राइव्ह इन लसीकरण ही सुविधा तातडीने सुरू करण्यात यावे.