पुणे ः
अशोक बालगुडे
कोरोना महामारीने जवळची माणसंसुद्धा दूर लोटू लागल्याचा मागिल वर्षभरापासून येत आहे. मात्र, महामारीमध्ये चक्क वृद्धांचा सांभाळ करण्याचे धाडस गंगा-तारा वृद्धाश्रमाच्या संस्थापक अध्यक्षा नीता भोसले आणि सचिव अॅड. लक्ष्मी माने) या गंगा-तारांनी केले आहे. कोरोनाबाधित मृत पित्याला अग्नी देण्यासाठी पुत्र जवळ येत नाही, अशी परिस्थिती आज समाजामध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे परक्या आजी-आजोबांचा सांभाळ करण्यासाठी गंगा-तारांनी एक पाऊल पुढे टाकून वृद्धांना बळ दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वडकी (ता. हवेली) येथे गंगा-तारा वृद्धाश्रम नीता भोसले आणि अॅड. लक्ष्मी माने यांनी मागिल वर्षी सुरू केले आहे. येथे दहा खोल्या असून, प्रत्येक खोलीमध्ये दोन वृद्धांच्या निवासाची सोय केली आहे. वृद्धाश्रमामधील वृद्धांची दर आठवड्याला डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याची तसेच आरोग्याची जातीचे काळजी घेतली जात आहे. वृद्धाश्रमामध्ये थोडी मोकळी जागा आहे, तेथे ऑर्गेनिक भाजीपाला पिकवला जातो, त्याचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. निसर्गरम्य वातावरण आणि मोकळी हवा असल्यामुळे राज्यभरातून येथे आलेल्या वृद्धांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. थर्ड इनिंगमध्ये का होईना आम्हाला मायेचा आधार मिळाला, ही आमची पूर्व पुण्याई आहे, अशी भावना वृद्ध मंडळींकडून व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. लक्ष्मी माने आणि नीता भोसले वृद्धाश्रमामधील वृद्धांची सेवा करीत आहेत. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. कोरोना महामारीमुळे मागिल वर्षभरापासून मूर्ती बनवून विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातीलच दोन कुटुंबे हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी नाला येथे भाड्याने जागा घेऊन व्यवसाय करीत होती, त्यांचा व्यवसाय बंद पडला, हातातोंडाची भेट होईना, लेकरांच्या अंगावर कपडे नाहीत, असे चित्र त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी तातडीने त्यांना दोन महिन्यांचा किराणा दिला, त्याशिवाय लेकरांना आणि त्या कुटुंबीयांना कपडे देऊ केले. त्यावेळी त्या कुटुंबीयांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. कोरोनामुळे मागिल वर्षभरापासून कोणी मूर्ती खरेदी करत नाही. मात्र, जागा मालकाचे भाडे थकत आहे, त्यात पोटाची खळगी भरता येईनात, उपाशीपोटी आम्ही राहतो, लेकरांना कसं सांगायचं, हे ऐकून आमचे हृदय पिळवटून गेले. कोरोना महामारीमध्ये मदत केल्याचा सोशल मीडियावर छायाचित्र टाकून धुमाकूळ घालणाऱ्या मंडळी दिखाव्यापेक्षा खरोखर धान्यरूपी मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, प्रसिद्धीसाठी हपापलेल्या मंडळींनी मदत करून प्रसिद्ध मिळवावी, अशी भावनाही त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.