पुणे

सीरमची उपलब्ध लस मिळविण्यासाठी चार दिवसांत केंद्राची परवानगी घ्या अन्यथा, भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – सामाजिक बांधीलकी म्हणून पुण्यासाठी कोविशील्ड लसीचे २५लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने दाखविली असून त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. तीन आठवडे उलटून गेले तरीही, भाजपचे नेते केंद्र सरकारची परवानगी मिळवू शकलेले नाहीत. त्यांनी येत्या चार दिवसांत परवानगी मिळवावी अन्यथा कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या पुण्यातील भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.

कोविड साथ निवारणासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे माहीत असतानाही केवळ टक्केवारी आणि अंतर्गत कलह यात भाजपचे नेते गुंतलेले आहेत या आरोपाचा पुनरुच्चार मोहन जोशी यांनी केला. सीरमने लस देण्याची तयारी दाखवली असली तरी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी लवकरच आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांची भेट घेणार आहोत, असे विधान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. वास्तविक, दिल्लीत प्रकाश जावडेकर हे वजनदार मंत्री आणि खासदार गिरीश बापट असताना महापौरांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्याची गरजच काय? ही टाळाटाळ करण्यामागे महापौरांचे टक्केवारीचे राजकारण आहे का? जावडेकर आणि बापट कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्त झाले आहेत का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला असून पुणेकरांसाठी एकेक दिवस महत्त्वाचा असताना भाजप नेत्यांची बेफिकीरी संतापजनक आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजप नेत्यांनी आपले अंतर्गत कलह बाजूला ठेवून कोविड लस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पुणेकरांच्या जिवाशी खेळू नये असे आवाहन दिनांक ३१ मे रोजी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन केले होते. त्यालाही आठवडा उलटून गेला. तरीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपची त्यादृष्टीने हालचाल दिसत नाही म्हणून आम्ही घंटानाद आंदोलनाचे पाऊल उचलत आहोत. पुणेकरांना तातडीने लस मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करेल असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x