पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष असून लवकरच पक्षाकडून मोहीम हाती घेतली जाईल, ही गावे बकाल होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.मोठ्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आग्रही राहिला आहे.केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना ठोसपणे राबविली होती. सांडपाणी निचरा प्रकल्प, प्रशस्त रस्ते, नदी सुधारणा अशा मूलभूत विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी काँग्रेस सरकारने उपलब्ध करून दिला होता. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना मेट्रो या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाया रचला गेला. हरित पुणे ही संकल्पना काँग्रेस पक्षाने मांडली आणि शहरातील टेकड्यांचे जतन केले.कॉंग्रेस पक्षाचे शहर विकासाचे धोरण राबवून पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांकडे लक्ष ठेवून तेथील समस्या सोडविणे, विकास कामांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे याकरिता मोहीम आखून काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क मंत्री सुनिल केदार यांना गावांच्या विकासासाठी मागण्यांचे निवेदन देऊन त्यांचे दौरे आखले जातील, २३ गांवातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातील. आगामी निवडणुकीची व्यूहरचना केली जाईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
२३ गांवे बकाल होऊ देणार नाही, गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार – माजी आमदार मोहन जोशी
Subscribe
Login
0 Comments