पुणे ः प्रतिनिधी
कोरोना महामारीवर लसीकरण सुरू असून, पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे. मात्र, जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यातच पुणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून हडपसर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ज्यांचा जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क येतो, अशा फेरीवाले, पथारीवाले, भाजीपालाविक्रेते, फळविक्रेते यांच्यासह छोट्या व्यापाऱ्यांना वॉक इन लसीकरण सुरू केले असून, त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने वॉक इन कोविड लसीकरण हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आज (बुधवार, दि. ७ जुलै २०२१) सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी ३४० छोट्या व्यापाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक योगेश ससाणे, पूजा कोद्रे, मारुती तुपे, उज्ज्वला जंगले, माजी नगरसेवक सुनील बनकर, स्वीकृत नगरसेवक संजीवनी जाधव, अविनाश काळे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, पथारीवाले संघटनेचे मोहन चिंचकर, परिमंडल वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.