पुणे

बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांच्याकडे मागणी

 

पुणे, दि. ४ ऑगस्ट (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले. त्यामुळे पुन:श्च हरिओम सारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र हताश न होता पुन्हा एकदा ताज्या दमाने प्रयत्न सुरू केलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (बुधवारी) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली.

या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा थरार त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेतात, त्यांचे संगोपन करतात याचा व्हिडिओ पशुसंवर्धनमंत्री श्री. रुपाला यांना दाखवला. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतींची ४०० वर्षांची परंपरा व संस्कृती यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते हा मुद्दा स्पष्ट केला. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी बैलगाडा शर्यती आकर्षणाचे केंद्र ठरू शकते आणि त्यातून पर्यटन व्यवसायाला खूप मोठी चालना मिळू शकते हा वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा मांडला.

मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीच्या परंपरेची माहिती दिली होती. तसेच बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची आग्रही मागणी केली होती. या चर्चेदरम्यान केंद्रीयमंत्री श्री. गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जॉईंट सचिवांसमवेत बैठकही आयोजित केली होती. त्यामुळे या अधिवेशनात ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी काही तरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांना होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलात पशुसंवर्धन खात्याचा कार्यभार पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना पुन:श्च हरिओम म्हणत नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याने त्यांनी आज केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेतली.

या भेटीत डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा इतिहास व परंपरा यांची माहिती दिली. तसेच बैलगाडा शर्यती बंद पडल्याने यात्रा-उत्सव ओस पडू लागले असून त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने होत आहे याची माहिती केंद्रीयमंत्री श्री. रुपाला यांना दिली. तसेच देशी खिलार जातीचा बैल केवळ बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जातो, त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. परिणामी देशी खिलार जातीच्या बैलांची संख्या पशुगणनेत ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे खिलार जातीचा हा देशी गोवंश वाचविणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, ही बाब केंद्रीयमंत्री रुपाला यांच्या निदर्शनास आणली. तसेच हा देशी गोवंश वाचविण्यासाठी ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली.

या भेटी संदर्भात माहिती देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री परशोत्तम रुपाला यांनी एकूणच विषय समजावून घेतला असून यापूर्वी झालेल्या चर्चेची माहिती श्री. गिरीराज सिंह व सचिवांकडून घेऊन त्यांनी काय कार्यवाही केली त्याचा आढावा घेऊ असे श्री. रुपाला यांनी सांगितले असून या विषयात लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करीत असून त्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.